मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात धन्यवाहून ट्रेकला भीषण अपघात चालक जखमी . अपघातात ट्रक व धान्यांचे मोठे नुकसान
खेड दि ६ डिसेंबर (वार्ताहर) मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अपघातांची मालिका थांबता थांबत नाही सोमवारी मध्यरात्रि अडीच वाजण्याच्या सुमारास धान्य वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक डिव्हायडर तोडून रस्त्याच्या पलीकडे जाऊन पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथून तांदूळ घेऊन अलिबागकडे निघालेल्या ट्रक भोस्ते घाट उतरत असताना उतारावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक डिव्हायडर तोडून रस्त्याच्या पलीकडे जाऊन शेतात पलटी झाला. या अपघातात ट्रकमधील धान्याच्या गोणी संपूर्ण शेतात विखुरल्या गेल्या त्यामुळे धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
धान्य वाहून नेणाऱ्या ट्रक ज्या ठिकाणी पलटी झाला त्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी मच्छी वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला होता. आज पुन्हा त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने अपघात झाला असल्याने भोस्ते घाट अपघातांसाठी शापित तर नाहीना अशी चर्चा रंगू लागली आहे.
महामार्गावरील अवघड भोस्ते घाटात होणाऱ्या जीवघेण्या अपघातांना चौपदरीकरणानंतर आळा बसेल असे वाटले होते मात्र महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून अपघात कमी होण्याऐवजी वाढू लागले असल्याने या घाटातून प्रवास करताना वाहन चालक आणि प्रवाशांच्या पोटात भीतीचा गोळा येऊ लागला आहे.