प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी मत्स्यगंधा, मंगळूरू रेल्वे गाड्यांमध्ये मध्ये रात्रीची गस्त

0
101

कोकण रेल्वेमार्गावरील काही गाड्यांमध्ये वारंवार चोर्‍या होत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षाबलाकडून मत्स्यगंधा, मंगळूरू एक्स्प्रेसमध्ये रात्रीची गस्त सुरू केली आहे. प्रवाशांबरोबर संवाद साधत जनजागृती करतानाच संशयितांवर रेल्वे सुरक्षा बलाची करडी नजर राहणार आहे. यामुळे चोर्‍यांना आळा बसणार असून प्रवासीही सतर्क होणार आहेत.
मुंबईसह अन्य जिल्ह्यातून कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या काही गाड्यांमध्ये २५ दिवसांतून अज्ञात चोरट्यांकडून एखादा प्रकार घडल्याच्या तक्रारी दाखल होत आहेत. गर्दीचा फायदा घेवून चोरटे हात साफ करतात. चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेणे, पॉकेट लांबवणे, दागिन्यांची पर्स चोरणे यासारखे प्रकार घडत आहेत. प्रवाशांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. प्रवाशांमधील भिती दूर करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक स्थानकावर स्थानिक पोलीसांचा फौजफाटा ठेवला जातो. मत्स्यगंधा, मंगळूरू एक्स्प्रेससारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या मोजक्याच स्थानकांवर थांबतात. याचाच फायदा चोरट्यांकडून घेतला जातो. स्थानकावर येण्यापूर्वी प्रवाशांची बॅग लपवून चोरटा पळून जातो. हा प्रकार लक्षात येईपर्यंत उशिर होतो आणि चोरट्याला पकडण्यात अडथळे येतात.
गेल्या महिन्याभरात सुमारे चार प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे सुरक्षाबलाच्या पथकाने एका अट्टल चोरट्याला प्रवासामध्येच पकडले होते. चोर्‍यांचे प्रकार रात्रीच्या सुमारास घडत असल्याने रेल्वे सुरक्षाबलही सतर्क झाला आहे. प्रत्येक स्थानकावर पोलिसांच्या मदतीने बंदोबस्त ठेवला जात आहे. तसेच सणासुदीवेळी गर्दीप्रसंगी दिवस-रात्र गस्त घातली जाते. त्याप्रमाणे रेल्वे सुरक्षाबलाकडून रात्रीची गस्त सुरू केली आहे. मत्स्यगंधा, मंगळूरू एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षाबलाचे कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांच्यामार्फत प्रवाशांशी संवाद साधून चोरट्यांपासून सतर्क राहा, असे आवाहन केले जाते. या द्वारे प्रवाशांमध्ये जनजागृतीही केली जात आहे.                   www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here