रत्नागिरी नजीकच्या मिरजोळे ग्रामपंचायतीचे नागरी विकास कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष
________
रत्नागिरी जवळील मिरजोळे ग्रामपंचायतच्या कारभारामुळे येथील स्थानिक ग्रामस्थांना नागरी सुविधा मिळत नसून खराब रस्ते,अपुरे पिण्याचे पाणी,मोकाट गुरे,उनाड कुत्री,उघडी गटारे,सांडपाणी अव्यवस्था यासह दैनंदिन केरकचरा उचलण्याची सोय नसल्याने कच-याचे साम्राज्य रस्तोरस्ती साठल्याचे चित्र सर्वत्र दिसत असल्याच्या तक्रारी आणि तीव्र संताप स्थानिक जनतेतून व्यक्त केला जात आहे.
कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काहीच उपाययोजना करीत नाही ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे येथील रहिवासी मिळेल त्या ठिकाणी कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे.दैनंदिन वापरातील कच-याचा प्रश्न ऐरणीवर आला असून काही लोक रहदारीच्या ठिकाणी काळोखाचा फायदा घेत कचरा टाकत आहेत.पतंजली भवनाच्या बाजूला गिरीजा रेसिडेन्सी इतकेच काय ज्या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होतो त्या ठिकाणी भर वस्तीच्या ठिकाणी कच-याचे ढीग साचलेले दिसतात.या कच-यातील प्लास्टिक पिशव्या व इतर रस्त्याच्या आजूबाजूला वा-याने पसरले जात असून सगळीकडे विद्रुपीकरण झाल्याचे दिसत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.काही दुकानदार नाशिवंत केरकचरा रस्त्यावर टाकत असून ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना,जिल्हा परिषद सदस्यांना वा प्रशासनाला वारंवार कळवूनही कोणीही लक्ष देत नसल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखवली.मागील अनेक वर्षे नागरिकांच्या मुलभूत नागरी सुविधांची परवड सुरु आहे
महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अखत्यारीत मिरजोळे ग्रामपंचायत येते.अनेक उद्योग या वसाहतीत आहेत.शिवाय असंख्य निवासी आणि वाणिज्य प्रकल्प येथे होत आहेत.औद्योगिक वसाहतीच्या आणि निवासी प्रकल्पांच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीला भरीव आर्थिक उत्पन्न मिळत आहे.नागरिकांच्या विविध कररुपी उत्पन्नांसोबतही शासकीय विविध अनुदाने या ग्रामपंचायतींला मिळत आहेत.एकूणच सर्व पातळीवर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली मिरजोळे ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक ग्रामस्थ आणि रहिवासींना जीवनमानाच्या अत्यावश्यक नागरी सुविधा मिळत नसल्याने या ग्रामपंचायतीच्या आर्थिक लेखाजोग्या विषयी नागरिकांच्या वतीने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.नागरी सोयीसुविधा देण्याचे कर्तव्य जर ग्रामपंचायत करणार नसेल तर वित्त आयोग व त्या अनुषंगाने येणारा निधी थांबविण्यात यावा तसेच उपलब्ध झालेला निधी व त्याचा झालेला विनियोग लेखाशिर्षकासह जाहीर करण्यात यावा अशीही मागणी जोर धरु लागली आहे.
ग्रामपंचायतीच्या कामात नागरिकांना मुलभूत नागरी सुविधा देणे हे प्रमुख काम आहे.मात्र आपल्या कर्तव्याचा विसर या ग्रामपंचायतीला जाणूनबुजून पडला की काय ? असा सवाल येथील ग्रामस्थ करीत आहेत.
कुवारबांव हे रत्नागिरीचे प्रवेशद्वार आहे.त्याला लागूनच मिरजोळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्र आहे.मात्र मिरजोळे परिसरातील अंतर्गत रस्ते उखडलेले आहेत.रस्त्यावरून वाहने सोडा पादचा-यांना चालणेही मुश्किल झाले आहे.बेवारस गुरे जागोजागी ठाण मांडून बसलेली दिसतात.कचरा संकलित करण्यासाठी ग्रामपंचायतीची योजना नसल्याने कांचन हॉटेल समोरील भागासह आदर्श नगर भागातील लोकांना कौटुंबिक वापरातील कचरा ही मोठी डोकेदुखी झाली आहे.विविध घरातील नागरिक कचरा संकलन,साठवण किंवा विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीने मागील कित्येक वर्षे लक्ष दिले नसल्याने पडवेवाडी, आदर्श नगर, कुवारबांव बाजारातील कचरा हा रहदारीच्या ठिकाणी टाकला जात असल्याने कच-याचे ढीग जागोजागी दिसून येत आहेत.यातूनच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.शिवाय जंतूनाशक फवारणी नसल्याने डासांचा उपद्रव वाढल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.मुख्य म्हणजे जागोजागी असलेली उघडी गटारे त्यातून सांडपाणी वाहून जात नसल्याने परिसरातील गटारे सांडपाणी,मलमुत्रांनी तुंबलेली असल्याने सर्वत्र दुर्गधीचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे.नागरी सुविधा अंतर्गत बंदिस्त गटारे,डास निर्मुलन,अंधारलेल्या रस्त्यावर दिवाबत्ती,बेवारस कुत्रे,मोकाट गुरे,कचरा व्यवस्थापन मुबलक पिण्याचे स्वच्छ पाणी ह्या अत्यावश्यक नागरी सुविधा कर भरणा-या नागरिकांना देणे ग्रामपंचायतीचे प्रथम कर्तव्य आहे.असे असताना मिरजोळे ग्रामपंचायत नागरिकांच्या मुलभूत व हक्काच्या नागरी सुविधा देण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप येथील वर्षानुवर्षे राहणारे त्रस्त नागरिक करीत आहेत.
औद्योगिक वसाहतीचे उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळत असतानाही जनतेला कचरा नेण्यासाठी कचरा गाडी उपलब्ध नसल्याने उष्टे खरकटे,नाशिवंतभाजी,कुजलेले, किडलेले पदार्थ रस्त्यावर टाकावे लागत आहेत.आधीच या परिसराला लागूनच मस्य प्रक्रिया करणारे उद्योग आहेत.मच्छीवर प्रक्रिया करुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या घाणीने सर्वत्र कुजट वास या परिसरात पसरत असतो.त्यातच गटारे बंदिस्त नसल्याने लगतच्या रहिवासींनी टाकलेल्या घाणीने पसरलेल्या दुर्गंधीतून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.सांडपाणी वाहून जात नसल्याने ही दुर्गंधी अधिकच वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
परिसरातील मस्य उद्योगांना ग्रामपंचायतीचा वरदहस्त असल्याचे चर्चिले जात आहे.मस्य उद्योजक महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाच्याही नियमांचे उल्लंघन करीत असून दुर्गंधीयुक्त पाणी सोडतांना कसलेही नियम वा वेळेचे तारतम्य बाळगत नसल्याचे दिसून येत आहे.
रत्नागिरी शहरातील नागरी वस्ती वाढल्यामुळे अनेकजण नजीकच्या वस्ती वाडीत रहायला जात आहेत.परिणामी शहरालगतच्या ग्रामपंचायती हद्दीत नवीन गृहप्रकल्प वाढत आहेत.उत्पन्नाचा स्रोत मोठ्या प्रमाणात वाढूनही ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायती मात्र नागरिकांना नागरी सुविधा देण्यात हेळसांड आणि जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागासह जिल्हाधिका-यांनी या भागाची पहाणी करावी अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने करण्यात येत असून मिरजोळे ग्रामपंचायतीच्या भोंगळ,नियोजनशून्य कारभाराची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
या प्रश्नी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येत असून त्यासाठी नागरिकांनी सह्यांची मोहिम सुरु केली आहे.संबधितांनी याबाबत वेळीच दखल न घेतल्यास भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार नागरिकांनी जाहीर केला आहे.ग्रामपंचायतीचे उत्पन्न आणि झालेला खर्च याचा तपशील जाहीर करण्यात यावा अशीही नागरिकांची मागणी आहे.
www.konkantoday.com