मासेमारी करून चरितार्थ चालविणार्या मच्छिमारांपुढे सध्या जेलीफिशचे संकट
मतलई वार्यांमुळे खोल समुद्रातील जेलीफिश मासा रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीला दाखल झाला असून त्याचा फटका रापणीसह गिलनेटने मासेमारी करणार्यांना बसला आहे. जयगडपासून पूर्णगडपर्यंतच्या किनार्यावर जेलीफिश आढळून येत आहे.
गेल्या महिनाभरात अपेक्षित मासळी मिळत नसल्याने मच्छिमार त्रस्त झाले आहेत. बदलत्या वातावरणामुळे वारंवार वादळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा मासेमारी बंद ठेवावी लागली. यंदा हंगामाच्या सुरूवातीपासून बांगडा मोठ्या प्रमाणात मिळत होता. मात्र फिशमिलच्या बांगड्याला १५ रुपये किलो तर खाण्यासाठीच्या बांगड्याला प्रतिकिलो चाळीस रूपये दर मिळत आहे. १२० ते १५० रुपये किलोने विकला जाणार्या बांगडा माशाला कवडीमोलाचा दर मिळू लागल्याने मच्छिमारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. मतलई वारे वाहू लागल्यानंतर मोठा मासा मिळेल अशी आशा होती, परंतु अपेक्षित मासा मिळत नसल्याचे मच्छिमार सांगत आहेत. ट्रॉलिंग, पर्ससीननेटला विविध प्रकारची फिशमीलचा मासा मिळत आहे. काही नौकांना ५०० किलोपर्यंत बला मासा मिळत आहे. त्याला १३० रुपये किलो दर मिळत आहे. किनार्यावर पाच ते दहा वावात मासेमारी करून चरितार्थ चालविणार्या मच्छिमारांपुढे सध्या जेलीफिशचे संकट आ वासून उभे ठाकले आहे. www.konkantoday.com