
संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याचे पुरस्कार जाहीर
रत्नागिरी : वन विभागामार्फत राबविण्यात येणार्या संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती वेळास (ता. मंडणगड) यांना जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विभागीय वनअधिकारी दीपक खाडे यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत.
या समितींच्यावतीने 84 गावांचे मूल्यमापन करण्यात आले व जिल्हास्तरीय समितीने अवलोकन करून हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी, विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण यांचा समावेश आहे. संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत पुरस्कारप्राप्त समिती पुढीलप्रमाणे : वेळास -प्रथम (51 हजार रूपये), संयुक्त वन समिती कोंगाळे -ता. दापोली (द्वितीय – 31 हजार रूपये), संयुक्त वन समिती घेरारसाळगड – ता. खेड (तृतीय – 11 हजार रूपये) असे तीन पुरस्कार देण्यात आले आहेत.
निवड झालेल्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचा प्रस्ताव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे. यशस्वी संयुक्त वन समितींचे विभागीय वन अधिकारी श्री. खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख, प्रा. बोराटे, श्री. दळवी यांनी अभिनंदन केले आहे. शासनाच्या वन विभागामार्फत ग्रामीण जनतेमध्ये वनाविषयी जागृती निर्माण व्हावी, या हेतूने संत तुकाराम वनग्राम योजने अंतर्गत पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्हाभरात 84 गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. शासन निर्णयानुसार या पुरस्कारासाठी सहभागी झालेल्या गावांना तालुका व जिल्हास्तरावर निवड करायची होती. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण सात समित्या पुरस्कारासाठी सहभागी झाल्या होत्या.