दापोली फाट्यावर एसटी कंडक्टरला मारहाण करणार्याला नऊ महिन्यांचा कारावास
खेड : मंडणगड – म्हाप्रळ मार्गावर एसटी वाहकाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला खेड न्यायालयाने नऊ महिने कारावास व सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सुरेश काशिराम खैरे (रा. कुडुक खुर्द, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. मंडणगड – म्हाप्रळ मार्गावर दापोली फाटा येथे दि. 10 मे 2019 रोजी ही घटना घडली. एसटी बस कंडक्टर विनोद बाळकृष्ण जाधव याने तिकीटाची विचारणा केल्याच्या कारणावरुन त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्याच्या विरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालय-1 खेड येथे खटला चालवण्यात आला. यात सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा कोर्टासमोर मांडण्यात आला. या प्रकरणी सरकारी वकील नितीन धोंगडे यांनी सरकार पक्षाच्या बाजूने, युक्तीवाद करुन संपूर्ण केसचे कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार उत्तम पिठेे, पोलिस निरीक्षक तसेच मंडणगड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शैलेजा सावंत तसेच कोर्ट पैरवी हरिश्चंद्र पवार यांचे सहकार्य लाभले.