
पीक विम्यासाठी आता राहिले फक्त २ दिवस, तत्काळ विमा उतरवावा- बाळ माने
रत्नागिरी- खरीप हंगामासाठी विमा उतरवण्याची मुदत १५ जुलै होती. परंतु तालुका खरेदी विक्री संघासह राज्यभरातील भाजप खासदार व शेतकऱ्यांच्या मागणीनंतर ही मुदत केंद्र सरकारने २३ जुलै केली आहे. भरपूर पडणारा पाऊस, वारा, तसेच चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संपूर्ण पीक विमा तत्काळ उतरवावा, असे आवाहन तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाळ माने यांनी केले आहे.
१ हेक्टरसाठी ४५ हजार ५०० रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येते. तसेच याकरिता एकूण विमा प्रीमियम २ टक्के भरायचा आहे म्हणजे हेक्टरी ९१० रुपये भरायचे असतात. यामध्ये ५० टक्के केंद्र व ५० टक्के राज्य सरकार विम्याचा प्रीमियम भरत असते. शेतकऱ्याला प्रति गुंठ्याला फक्त ९ रुपये भरावे लागतील. गुंठ्याला जास्तीत जास्त ४५०० रुपयांचे संरक्षण मिळते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पीक विम्यासाठी वाढीव दिलेल्या मुदतीत तत्काळ शेतकऱ्यांनी विमा उतरवावा, असे बाळ माने यांनी सांगितले. जिल्ह्यात गेली दोन वर्षे चक्रीवादळे येऊन नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतकऱ्याला बियाणे, खत, मजुरी किंवा शेतीविषयक कोणतीही नुकसान भरपाई मिळू शकत नाही, त्यामुळे पीक विमाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे राहिलेल्या दोन-तीन दिवसांत तत्काळ विमा उतरवा, असेही बाळ माने म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भातासाठी हमीभाव २७०० रुपये क्विंटलला जाहीर केला आहे. म्हणजे एक मणाला ९०० रुपये मिळते. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर करण्यात आली होती. गेल्या वर्षी १२०० शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. नुकसानग्रस्त २७५ शेतकऱ्यांना सुमारे १३ लाखांची भरपाई मिळाली होती. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंक, अग्रणी बॅंक असलेली बॅंक ऑफ इंडिया तसेच कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार यांनी लक्ष घालावे अशी मागणीही बाळ माने यांनी केली आहे.
www.konkantoday.com