चिपळूण अर्बन बँकेत 37 लाखांचा अपहार; संगणक विभाग प्रमुखाला अटक
चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेमधील अपहार प्रकरणी अखेर राहूल रमेश सुर्वे (रा. खेर्डी शिवाजीनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत बँकेच्या 37 लाख 75 हजार 45 रूपयांचा अपहार केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. येथील शाखा व्यवस्थापक संतोष देसाई यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात त्याच्याविरूद्ध फिर्याद दिली. त्यानुसार, सुर्वे याने दि. 8 सप्टेंबर 2020 ते 1 ऑगस्ट 2022 या कालावधीत हा अपहार केल्याचे दिसून आले आहे. सुर्वे हा बँकेमध्ये संगणक विभागप्रमुख म्हणून कार्यरत होता. त्याने बँक पासवर्डचा वापर करून बंद खात्यातील लोकांची रक्कम परस्पर वळवली. हा प्रकार ऑगस्ट महिन्यात उघड झाला. यानंतर ऑडीट करण्यात आले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून सुर्वेेला अटक करण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे करीत आहेत.