
दिवा रेल्वे स्थानकात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा रेल रोको,
पनवेल जवळ रेल्वे ट्रॅकवरती मालगाडी घसरल्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. या अपघातामुळे कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला. गाड्या वेळेत न आल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थानकावरती रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल रोको आंदोलन केले.त्यामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली.
पनवेल येथून वसईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे डबे शनिवारी दुपारी रुळावरून घसरले. या मालगाडीवर लोखंडी क्वाईल होते. या अपघातानंतर डबे रुळावर आणताना रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे दिवसभर या मार्गावरून जाणाऱ्या लांबपल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती.
अशातच पहाटे पावणे सातच्या सुमारास दिवा-सावंतवाडी ही गाडी आलीच नसल्यामुळे प्रवासी संतापले. रेल्वेची वाट पाहून ताटकळत उभे राहिलेले चाकरमानी हैराण झाले आणि त्यांच्या संतापाचा भडका उडाला. यानंतर शेकडोच्या संख्येने प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रवाशांनी रेल्वे मार्ग रोखून धरला, यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमंडले.
www.konkantoday.com