लोटेतील आग प्रकरणी तिघांवर गुन्हा
खेड : लोटे येथे डिझाईन केमिकल या रासायनिक कारखान्यात आग लागून भाजलेल्या कामगाराचा मृत्यू झाला. यात सात जण अद्याप गंभीर जखमी अवस्थेत उपचारात उपचार घेत आहेत. या अपघाताला जबाबदार असलेले कंपनीचे मालक व वेल्डिंग कामाचा मुकादम यांच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 13 रोजी सकाळी दहाच्या दरम्यान आग लागली. आशिष राम लखन मौर्य, विपल्य मंडल, संदीप कुमार परवेज सावा उर्फ गुप्ता, (36, मूळ रा. लक्ष्मीपूर ठाना, नौडिया, राज्य झारखंड), दिपक गंगाराम महाडिक, (54, रा. घाणेखुंट, खेड), सतीश चंद्र मौर्य, (27, रा. कालेकर वाडी, लोटे, खेड), मयूर काशीराम खाके, (32, रा. कुरवळ- जावळी, खेड), विनय मौर्य व दिलीप शिंदे हे आठ जण गंभीररित्या जखमी झाले.
यातील संदीप कुमार परवेज सावा उर्फ गुप्ता याचे दि. 14 रोजी रात्री 9.15 मि. नॅशनल बर्न हॉस्पिटल, ऐरोली, नवी मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले.
या अपघातास जबाबदार धरून पोलिसांनी कंपनी मालक अनुराधा मौर्य (रा. हिल व्हिव, बिंबीसार नगर, गोरेगाव, मुंबई), कंपनीचे काम पाहात असलेला त्यांचा मुलगा पीयूष मौर्य (रा. हिल व्हिव, बिंबीसार नगर, गोरेगाव, मुंबई, सध्या रा. खेंड, चिपळूण) व वेल्डिंग कामाचा मुकादम दीपक गंगाराम महाडिक, (54, रा. घाणेखुंट, खेड) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.