मुंबई – गोवा महामार्गाच्या कामासाठी आक्रोश समिती आक्रमक; 1 डिसेंबर रोजी जनता रस्त्यावर उतरणार
रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गाचे तळेकांटे ते आरवली दरम्यान काम सूरू आहे. या भागात जी कंपनी काम करत आहे तिचा मनमानी आणि अंदाधुंदी कारभार सुरू आहे. त्याचा त्रास स्थानिक लोकांना होत आहे. या कंपनीच्या विरोधात मुंबई -गोवा महामार्ग जन आक्रोश समिती संघटित झाली आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत समस्या न सोडवल्यास 1 डिसेंबर रोजी जनता रस्त्यावर उतरणार असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी यांना देण्यात आले आहे.
जन आक्रोश समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कारभाराचा पाढा अधिकार्यांसमोर मांडण्यात आला. महामार्गावर पडलेले खड्डे, महामार्गावर असणारी धूळ, निष्कृष्ट दर्जाच्या संरक्षण भिंती, शेतकर्यांच्या शेतीमध्ये टाकलेले डबर आणि गोटे, सुरू असलेले अनधिकृत क्रेशर, ब्लास्टिंगमुळे लोकांच्या घरांना गेलेले तडे, तोडलेले वृक्ष अशा विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
महामार्ग व्हावा यासाठी नागरिकांनी काही ठिकाणी मोबदला न घेता आपली घरे, दुकाने यांची जागा शासनाला दिली. मात्र प्रशासनाकडून आणि संबंधित कंपनीकडून लोकांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला. लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत.
आमची सहनशीलता संपली असून आता आम्ही 28 तारखेपर्यंत वाट पाहणार असून आमच्या मागण्या जर मंजूर झाल्या नाहीत तर 1 डिसेंबरला जन आक्रोश करण्यात येईल, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, खनिकर्म अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना नोटीस देण्यात आली आहे.
यावेळी परशुराम पवार, रमजान गोलंदाज, युयुत्सू आर्ते, अतिश पाटणे, हरीस शेकासन, वहाब दळवी, असलम खान, शब्बीर मजगावकर, विशाल रापटे, शकील गनकर, अमित सामंत, मैरुणीसा साखरकर, रफिक साखरकर, अबूबकर मुकादम, अभी तळेकर, नीलेश जाधव, सोहेल मुकादम, प्रतीक खैरे, रहीम दलाल, जमीर खलपे आदी उपस्थित होते.