पालकमंत्री परब आणि पक्षप्रमुखांच्या आजूबाजूला असणार्‍या चौकडीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला : आमदार योगेश कदम

रत्नागिरी : रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि पक्षप्रमुखांच्या आजूबाजूला असणार्‍या चौकडीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. मी आजही शिवसैनिक आहे, असे मत दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी शनिवारी येथील योगिता दंत महाविद्यालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांच्या काळात पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून माझे खच्चिकरण करण्याचा वेळोवेळी प्रयत्न झाला. माझ्या विरोधात उभे राहून पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराला शिवसेनेच्याच पालकमंत्री असलेल्या अनिल परबांकडून निधी देण्यात आला. मे महिन्यात पाच कोटींचा निधी देण्यात आला, असा आरोप माजी आमदार संजय कदम यांचे नाव न घेता आ. योगेश कदम यांनी केला. दापोली नगरपंचायत निवडणूकीच्या तोंडावरच माझ्या तालुकाप्रमुखांसह सर्वच पदाधिकार्‍यांना बाजूला सारून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या सर्व पदाधिकार्‍यांची वर्णी या ठिकाणी लावण्यात आली. दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणूकीत शिवसेनेच्या स्थानिक आमदाराला डावलून पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांकडे आणि नेहमीच शिवसेनेच्या विरोधात बोलणार्‍या माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्याकडे निवडणूकीची सुत्रे दिली. त्यामुळे गेले सहा महिने माझ्यावर अन्याय झाला. शिवसेनेचे नेते आणि खा. संजय राऊत यांच्यामुळे नाराज आमदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील दरी वाढत गेली. शिवसेना आमदारांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी पक्षप्रमुखांनी वेळ दिला नाही, असे आ. कदम म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत खेड तालुक्यातील शहर व ग्रामिण भागातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button