
सभासद नोंदणी करा, तरच तिकीट मिळेल…शिवसेनेत यापुढे वशिलेबाजीवर तिकीट मिळणार नाही : खा. विनायक राऊत
रत्नागिरी : यापुढे निवडणुकीचे तिकीट देताना उमेदवाराच्या मेरीटचा विचार केला जाईल, वशिलेबाजी चालणार नाही. जि.प.साठी इच्छुकांनी कमीतकमी अडीच हजार सदस्यांची नोंदणी केली तर तो उमेदवारीसाठी पात्र ठरेल, अशी भूमिका रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत यांनी स्पष्ट केली.
रत्नागिरीत आयोजित शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी खा. राऊत म्हणाले की, निवडणुका कधीही जाहीर होतील. तत्पूर्वी पक्षाने सभासद नोंदणीचा कार्यक्रम आखला आहे. रत्नागिरी, राजापूर, चिपळूणमध्ये जास्तीतजास्त नोंदणी इच्छुकांनी करायची आहे. तरच ते उमेदवारीसाठी पात्र ठरणार आहेत.
मागील काही दिवसांपासून आ. राजन साळवी यांच्या नावाने आवई उठवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असले उद्योग आता मुंबईत करा, असा सल्लाही राऊत यांनी दिला. या बैठकीला नेते आ. भास्कर जाधव, उपनेते आ. राजन साळवी, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम, सहसंपर्कप्रमुख राजू महाडिक, महिला जिल्हा संघटक वेदा फडके, दुर्वा तावडे, ममता जोशी, युवा सेनेचे पवन जाधव, अंकित प्रभू यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.