
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षेचा आढावा
रत्नागिरी : संसदीय रस्ता सुरक्षा आढावा समितीची बैठक मंगळवारी खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झाली. बैठकीला खासदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन शुभांगी साठे, पोलिस उप अधीक्षक (गृह) श्री. जगताप आदी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत म्हणाले, रस्ता सुरक्षा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी रस्त्याची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. याकरिता ज्या भागातील रस्ते नादुरुस्त आहेत , त्या रस्त्यांची कामे संबंधित विभागांनी त्वरित पूर्ण करावीत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना खासदार राऊत यांनी संबंधितांना दिल्या.
यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले, कोकणामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या अपघातांमध्ये मृत्युमुखी होणार्या व्यक्तींचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना रस्ता सुरक्षा समितीमार्फत सूचविल्या जाव्यात, हा समिती गठीत करण्याचा उद्देश असल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित विभागांनी आपल्या अखत्यारितील रस्ते दुरुस्त करावे, तसेच अपघातप्रवण क्षेत्राची माहिती करून सदर क्षेत्र हटविण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी सन जानेवारी 2018 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत रस्ते अपघातांच्या सर्व्हेक्षणांची माहिती दिली. राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते, पूल, बोगदे यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.