कळझोंडी परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार, हल्ल्यात पाडा गंभीर जखमी
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धवाडी येथे शनिवारी बिबट्याने एका शेतकर्याच्या गोठ्यात घुसून लहान तीन महिन्यांच्या पाडयावर हल्ला केल्याने या हल्ल्यामध्ये पाडा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी रविंद्र वीर उपचार करीत आहेत.
वरवडे धरण भागामध्ये गेले एक-दोन वर्षापासून बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे अनेकांनी पाहिले. गतवर्षी दोन तीन जनावरे परिसरातील बिबट्याने फस्त केली होती. या परिसरातील शेतकरी भयभीत झाले होते. यावर्षी पुन्हा देव दिवाळीच्या दरम्यान या बिबट्याने डोके वर काढले आहे. कळझोंडी बौद्धवाडी येथील शेतकरी रामचंद्र धर्मा पवार यांच्या मालकीच्या छोट्या पाड्यावर बिबट्या रात्री हल्ला करीत असताना गोठ्यातील इतर जनावरे ओरडली. गाईने मोठ्याने हंबरडा फोडल्याने घरातील माणसांनी तात्काळ लाईट लावला. लाईटचा प्रकाश व माणसांच्या हालचाली लक्षात घेवून बिबट्याने पळ काढला. दोन मोठे दात नरडीत घुसल्याने पाडा गंभीर झाला आहे.
www.konkantoday.com