
नाचणे येथे दुचाकीवरून पडलेल्या महिलेचा मृत्यू, दुचाकी चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी : दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा पडून अपघाती मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालक सिद्धेश विठ्ठल मटकर (24,रा.मूळ रा. राजापूर सध्या रा. शिवाजीनगर, रत्नागिरी ) याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना 9 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वा. नाचणे ते शिवाजीनगर जाणार्या रस्त्यावर घडली होती. बुधवारी सिद्धेश आपल्या ताब्यातील युनिकॉर्न (एमएच-08-एएफ-8381) वरून आरती गणेश जाधव (49, मूळ रा. ओरी, सध्या रा. टीआरपी, रत्नागिरी ) यांना घेऊन टीआरपी येथे भरधाव वेगाने जात होता. तो नाचणे ते शिवाजीनगर जाणार्या रस्त्यावर सर्विसिंग रॅम्पसमोर आला असता आरती जाधव दुचाकीवरून खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.10 वा. त्यांचा मृत्यू झाला. याचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.