वेल्डिंग करताना ठिणगी उडाली आणि केमिकलने घेतला पेट; लोटे येथील डिव्हायन कंपनीत आग लागून 8 कामगार भाजले
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीमधील डिव्हायन केमिकल या कंपनीत वेल्डिंग काम सुरू असताना ठिणगी पडून आग लागली. यावेळी जवळच ठेवलेल्या रसायनाचे कॅन पेटल्याने आठ जण भाजले आहेत. यातील तीन जण गंभीर आहेत. ही दुर्घटना रविवारी दि.13 रोजी सकाळी घडली आहे. रविवारी दि.13 रोजी सकाळी पटवर्धन लोटे येथील औद्योगिक वसाहतीमधील डिव्हायन केमिकल या छोट्या कारखान्यात वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी अचानक ठिणग्या पडून आग लागली. कारखान्यात ठेवलेले रसायनाचे ड्रम पटल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत कारखान्यात असलेले आठ कामगार भाजले. सतीशचंद मुकुंदचंद मोर्या , विनय मोर्या, दीपक गंगाराम महाडिक, मयूर खाके, आदिश मौर्या, संदीप गुप्ता, बिपिन मंदार, दिलीप दत्ताराम शिंदे अशी त्यांची नावे आहेत. यातील सतीशचंद मोर्या, दिलीप शिंदे, विनय मोर्या, दीपक महाडिक, मयूर खाके या पाचजणांना चिपळुणातील लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला उपचारासाठी हलविण्यात आले. यातील विनय मोर्या, दिलीप शिंदे व अन्य एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उचारासाठी मुंबई ऐरोली बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. कारखान्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या अपघातानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले.