
काळमांजराच्या पिल्लांना वनविभागाने सोडले नैसर्गिक अधिवासात
रत्नागिरी : पाली येथील देवतळेजवळ एका घराशेजारी रिकाम्या हौद्यात कांडेचोराची (काळमांजर) तीन पिल्ले सापडल्याची माहिती एका नागरिकाने वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्यांनी ही पिल्ले ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. अरविंद विंचू यांच्या घराशेजारी काळमांजराची सुमारे सहा महिन्याची तीन पिल्ले आढळून आली. त्यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. त्यानुसार परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, पालीचे वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक प्र. स. साबणे यांनी विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वन संरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही काळमांजरांना नैसर्गिक अधिवासात सोडले. वनप्राणी मनुष्यवस्तीत दिसून आल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांनी केले आहे.