भाट्ये खाडीतील गाळ उपशासाठी यंत्रणा कार्यरत; पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात झाली होती चर्चा
रत्नागिरी : राजिवडा, कर्ला, भाट्ये आणि फणसोप या परिसरातील मच्छीमारांच्या नौका समुद्रात जाण्यासाठी भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. हा मार्ग गेल्या अनेक वर्षापासून गाळाने भरला आहे. तसेच या मार्गात खडकही तयार झाल्याने मच्छीमारांसाठी धोका निर्माण झाला आहे. भाट्ये खाडीच्या मुखाशी मांडवी बंदरात साचलेल्या गाळाची पत्तन विभाग, मेरिटाईम बोर्ड आणि मत्स्य विभागाच्या अधिकार्यांनी यांत्रिक बोटीने जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व मच्छीमारांशी चर्चा केली. हा गाळ उपसण्याची तसेच बंधारा घालण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून शासनाकडे सुरू आहे. या संदर्भात दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे मच्छीमारांनी जनता दरबारात पालकमंत्र्यांकडे न्याय मागितला होता. पालकमंत्र्यांनी तातडीने गाळ उपसण्याबाबत हालचाल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अधिकार्यांनी शनिवारी येथील गाळाची पाहणी केली. यावेळी मच्छीमाार संघर्ष समितीचे पदाधिकारी नजीर वाडकर, शफी वस्ता, इम्रान सोलकर, युसूफ भाटकर, रहिम दलाल, रफीक फणसोपकर आदी उपस्थित होते.