दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी 62 पानांचे पुरावे पोलिसांकडे दिले : सोमय्या यांची पत्रकार परिषदेत माहिती
रत्नागिरी : माजी मंत्री अॅड. अनिल परब यांच्या दापोलीतील बेकायदेशीर साई रिसॉर्ट प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी आपला चार पानी जबाब नोंदवून घेतला असून 62 पानांचे पुरावे आपण पोलिसांना पुन्हा सादर केले आहेत. पोलिस कायदेशीर प्रक्रिया करत आहेत. तर दुसर्या बाजुला साईरिसॉर्ट तोडण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून ठेकेदाराची नियुक्ती झाल्यानंतर साई रिसॉर्ट तोडले जाईल अशी माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, माजी नगरसेवक उमेश कुलकर्णी, दादा ढेकणे, राजू भाटलेकर आदी उपस्थित होते. रत्नागिरीतील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली. पालकमंत्री असताना अधिकाराचा गैरवापर करून दापोली येथे बेकायदेशीर साई रिसॉर्ट उभारण्यात आले. आपण आवाज उठवल्यानंतर ते सदानंद कदम यांना विक्री केल्याचे दाखविण्यात आले. परंतु, खरेदी-विक्री प्रकरणातील पैसे दिल्याचा तपशील अनिल परब यांनी का लपवला आहे? असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला.
खरेदी खतामध्ये सर्व तपशील नमूद नसताना उपनिबंधकांनी तो नोंदवून कसा घेतला? अधिकारी पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत होते हे स्पष्ट झाले आहे. सरकारी अधिकार्यांच्या मदतीने हा घोटाळा करण्यात आल्याने खोटा दस्तावेज देऊन बिनशेती केल्याचा गुन्हा अनिल परब यांच्याविरोधात दाखल करण्यात यावा, अशी मागणी आपण जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. त्यांनीही चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले. 14 नोव्हेंबरनंतर या रिसॉर्ट तोडण्याच्या कारवाईला वेग येईल, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान आणखी नावे पुढे येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.