
ठाकरे सरकार गेले आहे, हे जितेंद्र आव्हाडांनी विसरू नये : भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा टोला
रत्नागिरी : शिंदे-फडणवीस सरकार आल्यामुळे आता माफियाराज संपले आहे. ठाकरे सरकार गेले आहे, हे जितेंद्र आव्हाडांनी विसरू नये, असा टोला भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. सोमय्या यांनी आव्हाड यांच्या अटकेचे समर्थन केले आहे. शुक्रवारी ते रत्नागिरीत आले असता पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा समाचार घेतला. ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना हेच जितेंद्र आव्हाड रात्री-अपरात्री कुणाच्याही घरात घुसत असत, शिविगाळ करीत, मारहाण करत असत. ठाकरे सरकारने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याऐवजी त्यांनाच संरक्षण पुरवण्याचे काम केले. असाच प्रकार त्यांनी हर हर महादेव चित्रपट सुरु असताना नुकताच केला. थिएटरमध्ये आपल्या समर्थकांसह घुसून केला. खरे तर त्यांनी वैचारिक मुद्मावरुन यावर बोलायला हवे होते.
मंत्री असताना त्यांनी ज्या युवकाला घरी आणून मारहाण केली होती. त्या प्रकरणाचा सुद्धा पाठपुरावा करावा, अशी मागणी आपण शिंदे -फडणवीस सरकारकडे केली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.