कोकण कृषी विद्यापीठ पतसंस्थेच्या एका जागेसाठी मतदान
दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या एक जागेसाठी दि. 12 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. इतर मागास प्रवर्ग गटातील एका जागेसाठी शेखर रमेश पालकर व दीपक बळीराम मळवे हे रिंगणात होते. कर्मचारी सह. पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 12 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. केवळ एका जागेसाठी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 10 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वसाधारण गटातून सखाराम देसाई, जीवन कदम, रणजीत महाडिक, मारुती सावंत, उदयकुमार पेठे, स्वप्नील देसाई, चंद्रकांत घोडेराव, रवींद्र सूर्यवंशी, महिला प्रतिनिधी गटातून प्रिया बेलोसे, विनया शिंदे, भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून ऋषिकेश हांडे, अनुसूचित जाती जमाती गटातून संजय तांबे हे 12 सदस्य बिनविरोध संचालक म्हणून निवडून आले आहेत. या एक जागेसाठी पालघर, कर्जत, पनवेल, रोहा, दापोली, वाकवली, शिरगाव रत्नागिरी, लांजा, कुडाळ, वेंगुर्ला या मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर ही प्रक्रिया पार पडली. पतसंस्थेचे 1 हजार 306 सभासद या निवडणुकीत मतदान करण्यात पात्र होते. 14 रोजी मतमोजणी होणार असून चिपळूणचे सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर हे या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.