
सोमेश्वर येथील प्रौढाला पोलिस कोठडी; कामाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध, ठार मारण्याची धमकी
रत्नागिरी : सोमेश्वर येथील घरी जबरदस्तीने नेऊन तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. तिने नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करत मारहाण आणि ठार मारण्याची धमकीही वारंवार दिली. शेवटी पीडितेने पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. सोमेश्वर बौद्धवाडी येथील या संशयिताला न्यायालयाने गुरुवारी 13 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. नरेश विठोबा जाधव (वय44, रा. सोमेश्वर बौध्दवाडी, रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित तरुणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तरुणीला माझ्याकडे कामाला पाठवा, मी तुम्हाला चांगले पैसे देईन. तसेच तुमचा सगळा घर खर्च भागवेन, असे सांगत सोमेश्वर येथील घरी जबरदस्तीने नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शेवटी कंटाळून तिने बुधवार 9 नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शहर पोलिसांनी नरेशला गुरुवार 12 नोव्हेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.