चालत्या गाडीत पिस्तुलाने गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी दोन संशयित निर्दोष

रत्नागिरी : चालत्या गाडीत गोळीबार करत खून केल्याप्रकरणातील दोन संशयित आरोपींची न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्‍तता केली. आर्थिक व्यवहारातून ही घटना 13 जानेवारी 2020 रोजी रात्री 9.30 वा.अल्ट्राटेक कंपनीसमोरील रस्त्यावर घडली होती.
किरण मल्‍लीकार्जुन पंचकट्टी (राहणार गुलबर्गा, कर्नाटक) आणि त्याचा साथीदार लक्ष्मण कनटप्पा शिंदे (राहणार सोलापूर) अशी निर्दोष मुक्‍तता करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
या दोघांनाही दत्‍ताराम बलभीम क्षेत्री (रा. झाडगाव एमआयडीसी, रत्नागिरी) याचा खून केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी आरोपींच्या वतीने अ‍ॅड. नेने यांनी केलेला युक्‍तिवाद आणि दोन्ही संशयित आरोपींची सबळ पुराव्याअभावी जिल्हा न्यायाधीश एल.डी.बिले यांनी निर्दोष मुक्‍तता केली. किरण हा कर्नाटक येथे एकावर वार करून पळून रत्नागिरीत दत्‍ताराम क्षेत्रीकडे येऊन राहात होता. तेव्हा क्षेत्रीने किरणला 9 लाखांचे कर्ज काढून व्यवसाय करण्याचा सल्‍ला दिला होता. त्यातील 3 लाख किरणने दत्‍ताराम क्षेत्रीला व्याजाने देऊन उर्वरित 6 लाखांचा व्यवसाय सुरू केला होता. कालांतराने किरण हा क्षेत्रीकडे व्याजाची वारंवार मागणी करू लागला, परंतु त्याचा राग आल्याने क्षेत्रीने किरणला व्याज देण्यास नकार देत त्याला मारहाणही केली होती.
याच राग मनात धरून किरणने क्षेत्रीच्या ऑफीसमधील त्याचेच पिस्तुल चोरून लक्ष्मणसोबत जाऊन दत्‍ताराम क्षेत्रीला मारण्याचा कट रचला. 13 जानेवारी 2020 रोजी दत्‍ताराम क्षेत्री आपल्या ताब्यातील क्रेटा (एमएच-08-एपी-2097) मधून घरी जात असताना शेट्ये नगर स्टॉपजवळ किरणने क्षेत्रीला हात दाखवून गाडी थांबवली. त्यानंतर गाडीच्या मागील सिटवर बसल्यानंतर किरणने चालत्या गाडीत क्षेत्रीच्या डोक्याच्या मागील बाजूस गोळी मारली. त्यानंतर गाडी अल्ट्राटेक कंपनीच्या गेटच्या कंपाऊंडवर आदळल्यानंतर किरणने गाडीतून पळ काढून लक्ष्मणला फोन करून बोलावून घेत त्याच्याकडे गुन्ह्यातील पिस्तुल दिले होते.
लक्ष्मणने ते पिस्तुल पालापाचोळ्यात लपवून ठेवत किरणला मदत केली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्यावर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button