
ग्रामदेवतेच्या कार्यक्रमात डावलल्याने ग्रामस्थांची लांजा पोलिस ठाण्यावर धडक
लांजा : ग्रामदैवत श्री धनी केदारलिंगच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपल्याला डावलून बहिष्कृत केले जात असल्याची तक्रार तालुक्यातील हर्दखळे वरची गुरववाडी ग्रामस्थांनी केली. यावेळी धडक मोर्चा काढीत लांजा पोलिस ठाणे तसेच तहसील कार्यालयात म्हणणे मांडण्यात आले. आम्हाला बहिष्कृत करणार्या गणेश इंदुलकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, आमच्या वाडीत 27 घरे असून आमचे ग्रामदैवत श्री केदारलिंग यांच्या शिमगोत्सवात गणेश वसंत इंदूलकर यांनी पालखीसोबत असणारे खेळे, साज यांनी वरची गुरववाडी यांच्या घरी जेवायला जायचे नाही, असे फर्मान काढल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर 4 एप्रिल 2022 रोजी पोलीस वसाहत सभागृह लांजा येथे ग्रामस्थ, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पोलीस पाटील यांची सभा होऊन या वादावर तोडगा काढण्यात आला होता. त्यानंतर गणेश इंदुलकर मनमानी करू लागले आहेत.
केदारलिंग देवाच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवानंतर सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम 9 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन एक महिना अगोदर करावयाचे होते. त्यानुसार गणेश इंदुलकर यांनी 13 ऑक्टोबर रोजी त्यांच्या गटातील लोकांची मीटिंग घेवून वरची गुरववाडीतील आम्हा ग्रामस्थांना न बोलता परस्पर निर्णय घेतला. गणेश इंदुलकर यांनी तहसीलदार लांजा यांच्यासमोर झालेला निर्णय पायदळी तुडवून आम्हा ग्रामस्थांना डावलून बहिष्कृत करून निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन सादर करताना गोविंद गुरव, किशोर गुरव, सुभाष गुरव, प्रशांत गुरव, शामसुंदर गुरव, प्रदीप गुरव, शांताराम गुरव, मधुकर गुरव, श्रीधर गुरव, अरुण गुरव, सुरेश गुरव, विजय गुरव, मनोहर गुरव, कृष्णा गुरव, संतोष गुरव, निवृत्ती गुरव, संदीप गुरव, सुभाष गुरव, सुभाष गोवळकर, प्रमोद गुरव, सुरज गुरव, सुनील गुरव आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.