
देशातील भ्रष्टाचार निर्मुलनासाठी एकत्र येऊन काम करावे : डाक निरीक्षक शरद खांदारे
संगमेश्वर : देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार ही प्रमुख समस्या अडथळा ठरत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार निर्मुलनासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा डाक निरीक्षक शरद खांदारे यांनी केले. माळवाशी येथे डाक विभागाच्या ‘विकसित भारत-भ्रष्टाचारमुक्त भारत’ कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून खांदारे बोलत होते.
यावेळी सरपंच वैजयंती करंडे, उपसरपंच सुनील सावंत, ग्रामपंचायत सदस्य विष्णू सावंत, अनुष्का सावंत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कमलाकर कांबळे, डाक विभागाचे रमेश गेल्ये, सुभाष पंदेरे, बाळकृष्ण करंडे, रमेश जौरत, सदानंद माने, कृष्णा सावंत, महेश सावंत, विजय राऊत यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी शरद खांदारे, पंदेरे, गेल्ये यांनी डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. उपसरपंच सुनील सावंत म्हणाले, डाक विभागाच्या विविध योजना या सामान्य नागरिकाला केंद्रीभूत मानून राबविण्यात येतात. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यायला हवा, असे आवाहन सावंत यांनी केले. उपस्थितांना उपक्रमाबाबत प्रतिज्ञा देण्यात आली. नागरिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर करंडे, प्रदीप करंडे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.






