गणपतीपुळेतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे भूमिपूजन
रत्नागिरी : श्री क्षेत्र गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखडा कार्यक्रमांतर्गत गणपतीपुळे गावाकरिता सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविणे या कामाचे भूमिपूजन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप कार्यकारी अभियंता प्रसाद सुर्वे, उपअभियंता ए.डी.चौगुले, गणपतीपुळेच्या सरंपच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार आदी मान्यवर उपस्थित होते. या कामांतर्गत Intergrated Wetland Technology (IWT) वर आधारित 7,50000 लिटर्स प्रतिदिन क्षमतेच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचा समावेश आहे. तसेच गणपतीपुळे शहरात भूमिगत गटार वितरण व्यवस्थेसाठी 150 ते 250 मि.मी. व्यासाचे 8179 मी. लांबीचे HDPE ( Double Wall Corrugated) प्रकारचे पाईप्स टाकण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी 24 महिने इतकी कालमर्यादा असून काम पूर्ण झाल्यावर मक्तेदारामार्फत पुढील 5 वर्षासाठी ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली योजनेची देखभाल दुरुस्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी 8 कोटी 53 लाख 2 हजार 430 रुपयाची निविदा मंजूर करण्यात आली आहे.