
कोकणात लॉजिस्टिक व मरीन पार्क उभारणार : ना. उदय सामंत
खेड : कोकणात उपलब्ध जागा केंद्राला देऊन लॉजिस्टिक्स पार्क सोबतच किनाऱ्यावरील जागेवर मरीन पार्क ते लोटे औद्योगिक वसाहती सारख्या ठिकाणी मँगो पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी रविवारी दि.६ रोजी लोटे येथील उद्योग भवनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत दिली.खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी रविवारी दि ६ रोजी भेट दिली. यावेळी उद्योग भवनात उद्योजक संघटना, स्थानिक नागरीक, समाजसेवी संघटना यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध संघटना व व्यक्तींची निवेदने स्विकरली व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार परिषदेत ना. सामंत म्हणाले, लोटे औद्योगिक वसाहती संदर्भात प्राप्त सर्व निवेदनावर पुढच्या आठवड्यात चर्चा करून वेगाने निर्णय घेण्यासाठी उद्योजक संघटना प्रतिनिधी, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येतील. या औद्योगिक वसाहतीला भेडसावणारी पाणी समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धन करण्यासाठी मी तत्वतः मान्यता दिली आहे. याबाबत आवश्यक निधीच्या तरतूद करण्यात येईल. लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या समस्या सोडवत असताना त्यांच्याकडून देखील माझ्या अपेक्षा आहेत की त्यांनी देखील अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. कामगारांना सुरक्षा साधने पुरवण्याची , प्रदूषण होऊ नये यासाठी कारखानदारांनी काम करण्याची त्यांची जबाबदारी आहे. कोकणासह राज्यात शिंदे व फडणवीस यांच्या नेतत्वाखालील काम करत असलेले सरकार नवीन प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून लवकरच दिल्ली येथे जाऊन मी केंद्रीय मंत्र्यासोबत चर्चा करणार आहे. गेल्या काळात वेदांता, सफ्रोन सारखे प्रकल्प राज्याबाहेर गेले याचे दुःख आहेच पण त्याही पेक्षा मोठे प्रकल्प राज्यात आम्ही आणू असा विश्वास ना. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.कोकणातील ग्रीन रिफायनरी बाबत ते म्हणाले, रिफायनरी प्रकल्प हा बेरोजगारांच्या हाताला रोजगार देणारा ठरणार असल्याने त्याचे महत्व स्थानिकांना पटवून देऊन तो करण्याच्या दृष्टीने हे सरकार सकारात्मक आहे.