लांजा नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
लांजा : लांजा नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. लांजा नागरी सहकारी पतसंस्था ही तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील एक अग्रणी पतसंस्था म्हणून ओळखली जाते.
पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर एकूण ३४ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष प्रवर्गातून अशोक म्हेत्रे आणि अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रवींद्र पावसकर हे निवडणूकीपूर्वीच बिनविरोध झाले होते. त्यानंतर अकरा जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सर्वसाधारण जागांसाठी २२, ओबीसी मतदारसंघासाठी पाच तर महिला मतदार संघासाठी पाच असे ३२ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे संस्थेची निवडणूक होणार अशी अटकळ बांधली जात होती. मात्र अखेर ही निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून प्रवीण जेधे, अभिजित गांधी, शिवाजी कोत्रे, चंद्रशेखर सावंत, प्रसाद बेंडखळे, किशोर यादव, अनंत आयरे, शरीफ नाईक, महिला प्रतिनिधी मतदार संघातून मधुरा लांजेकर आणि संपदा वाघधरे तर इतर मागासवर्गातून सचिन भिंगार्डे हे बिनविरोध झाले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संस्थेचे संस्थापक आणि जेष्ठ सल्लागार डॉ.अनिल पत्की, महंमद रखांगी, भाऊ वंजारे, प्रसन्न शेट्ये, प्रदीपकुमार बेंडखळे यांनी प्रयत्न केले. तर आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून आपले उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या आणि संस्थेचा खर्च वाचवून संस्थेचा नावलौकिक वाढवल्याबद्दल सर्व उमेदवारांचे संस्थेच्यावतीने आभार मानण्यात आले.