मंडणगड तालुक्यातील मायनिंगवरून शिवसेनेचे दोन गट आमनेसामने

मंडणगड : शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या डंपर अपघातानंतर तालुक्यात सुरू झालेल्या मायनिंग वाहतुकीची चर्चा होऊ लागली आहे. अपघानंतर लगेचच सेनेच्या ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गोवळे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष वैभव कोकाटे, काँग्रसचे श्रीपाद कोकाटे, व्यावसाईक पराग करमरकर, आनंद नारकर व नागरिक घटनास्थळी जमा झाले. झाल्या घटनेचा निषेध करत मायनिंगची वाहतूक बंद पाडण्याची चर्चा सुरु झाली. यानंतर बॉक्साईट वाहतूक करणारे तीन डंपर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. यावेळी तालुक्यातील अरुंद रस्त्यांच्या सद्यस्थितीचे कारण पुढे करुन वाहतूक बंद करण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली. तसेच वाहतूक सुरू करून यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, अशी आग्रही भूमिकाही घेतली आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी भिंगळोली येथे जमाव करुन एक डंपर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. याचवेळी वाहतुकीच्या समर्थनासाठी शिवसेना शिंदे गटाचे दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष आदेश केणे, चेतन सातोपे, प्रतिक पोतनीस यांच्यासह नागरिक घटनास्थळी जमा झाले. तालुक्यात तरुणांना कोणत्याही प्रकारचा रोजगार नसल्याने रोजगार निर्मितीच्या प्रयत्नांना विरोध करण्याची भूमिका योग्य नसल्याचे मत मांडू लागले. यावेळी दोन्ही गटात तू- तू, मै -मै झाल्यानंतर समर्थन व विरोधाची चर्चा सुरू झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button