हॉटेलमधील नोकराने लांबवले मालकिणीचे 2 लाख 80 हजारांचे दागिने
राजापूर : दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले दागिने व त्या आधी गणेशोत्सवामध्ये असे दोन वेळा तब्बल २ लाख ८० हजाराचे दागिने नोकराने लांबवल्याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर यशवंत दळवी (वय २५, रा. प्रिंदावण ता. राजापूर) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या नोकराचे नाव आहे. याबाबत संजय लक्ष्मीकांत काणेकर, वय ५० वर्षे, रा.उन्हाळे (हातिवले) आगरेवाडी ता. राजापुर यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार काणेकर यांच्या मालकीचे हॉटेल अंकिता पॅलेसमध्ये दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन असल्यामुळे त्यांच्या पत्नीचे दागिने पूजनाकरिता पूजनास ठेवले होते. त्यामध्ये गळ्यातील सोन्याचा हार, हातातील सोन्याच्या तोड्याचा जोड, तसेच हातातील सोन्याच्या बांगड्यांचा जोड व सोन्याचे ब्रेसलेट व मुलांचे इतर दागिने पूजनास हॉटेलच्या ऑफिसमध्ये ठेवले होते. त्या रात्री दागिने ऑफिसमध्येच ठेवण्यात आलेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. दागिन्यांची उत्तर पूजा करुन सर्व दागिने डब्यात भरुन पुन्हा कपाटात ठेवण्यात आले होते.
त्यानंतर कपाटात ठेवलेला दागिन्यांचा डबा उघडून पाहिला असता त्यामध्ये दोन सोन्याच्या बांगड्या दिसल्या नाहीत. हॉटेलमधील कामगारांना दागिन्याबाबत विचारले असता ते सर्वजण दागिन्याबाबत काही माहीत नाही, असे म्हणाले. रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता हॉटेलमधील कामगार सागर यशवंत दळवी याची चौकशी करण्यात आली.
गणपती उत्सवाच्यावेळी दोन सोन्याचे तोडे आपण चोरल्याचे कबुल केले. त्यास सोन्याचे तोडे कोठे आहेत, असे विचारले असता त्याने रत्नागिरी येथील एका व्यक्तीकडे गहाण ठेवल्याचे सांगितले. तर सोन्याच्या बांगडी चोरीबाबत विचारले असता ते सुद्धा त्याने आपणास पैशाची गरज होती म्हणून चोरल्याचे सांगून ते दागिने सुद्धा रत्नागिरी येथील एका व्यक्तीकडे गहाण ठेवल्याचे सांगितले. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दळवी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास राजापूर पोलिस करत आहेत.