रत्नागिरीत एकादशीला भाविकांची मांदियाळी; खरेदीसाठी गर्दी
रत्नागिरी: रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्या विट्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त शुक्रवारी भाविकांचा भक्तीचा मळा फुलला होता. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी यावर्षी अलोट गर्दी केली होती. कोरोनाकाळानंतर प्रथमच भरलेल्या यात्रेला नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. रामआळी, मारुती आळी, गोखले नाका आदी रस्ते गर्दीने फुलून गेले होते. गर्दीने मागील उच्चांक मोडीत निघाला.
प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रखुमाई मंदिरातील यात्रा कोरोनाने तीन वर्षे बंद होती. मात्र यंदा कोरोना मुक्तीमुळे मोठी यात्रा भरली. जिल्ह्याभरातून भाविकांनी दर्शन व यात्रेच्या खरेदीला भाविकांची गर्दी केली होती. एकादशीनिमित्त मंदिरातील वातावरण टाळ-मृदुगांच्या, विठ्ठल रखुमाईच्या नामगजराने भक्तीपूर्ण होऊन गेले होते. श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींना अलंकारांनी सजवण्यात आले. पहाटे विधीवत पूजा अर्चा झाल्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले होते. याचबरोबर प्रतिवर्षाप्रमाणे काकड आरती पहाटे चार वाजता, त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिराच्या सभामंडपात अनेक मंडळांनी दिवसभर भजन सादर करून विठ्ठल चरणी सेवा अर्पण केली.
रात्री 12 वाजता विठुरायाचा रथ प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला. गोखले नाका, राधाकृष्ण नाका, गवळीवाडा येथील दत्तमंदिरला रात्री 2 वाजता भेटून राधाकृष्ण मार्ग राम आळी, मग तेली आळी, मारूती आळी व तेथून विठ्ठल मंदिर या ठिकाणी रथ स्थानापन्न होतो. पालखी श्री देव भैरीच्या भेटीला जाते. पहाटे 5 वाजता पालखी पुन्हा मंदिरात येऊन विसावते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही देवस्थानाने भाविकांसाठी उत्सवाची उत्तम व्यवस्था केली. याचबरोबर कुवारबाव येथील विठ्ठल मंदिरातही कार्तिकी एकादशी भक्तीभावात साजरी करण्यात आली. मध्यरात्रीनंतर बाहेर गावच्या प्रवाशांसाठी एसटीतर्फे जादा बसेस सोडण्यात आल्या.