मिरकरवाडा येथे समुद्रातील माशाचे जाळे ओढताना खलाशाचा मृत्यू
रत्नागिरी : मिरकरवाडा येथे समुद्रातील माशाचे जाळे ओढत असताना लोखंडी कप्पा गळ्यावर लागून खलाशाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अब्दुल गणी मुसा पोसग्या (45, मूळ रा. कारवार, सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. गुरुवारी तो सहकाऱ्यासह मिरकरवाडा समुद्रात 20 वाव पाण्यामध्ये मासे मारण्यासाठी टाकलेले जाळे ओढत होता. तेव्हा जाळ्याला असलेला लोखंडी कप्पा तुटून अब्दुलच्या गळ्यावर जोरात लागल्याने तो बेशुद्ध झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अब्दुलला तपासून मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस हवालदार पालांडे करत आहेत.