
रत्नागिरी शहरातील वाहतूक व्यवस्थेला लावणार शिस्त : पोलिस अधीक्षक कुलकर्णी
रत्नागिरी : शहरात मागील काही वर्षात वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पार्किंगची सुविधा नसल्याने आणि बाजारपेठेतील छोट्या रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आता पुढाकार घेतला आहे.
सुरक्षित वाहतुकीसाठी सुसज्ज आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक विभागाला दिल्या आहे. शहरातील पार्किंगच्या जागा खुल्या करण्यावर भर दिला जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. रत्नागिरी शहर दिवसेंदिवस वाढत आहे. शहरानजिकच्या बहुतांश गावातून ग्रामस्थ आपली वाहने घेऊन शहरात येतात. त्यामुळे दिवसा वाहनांची संख्या दुप्पट होते. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ता प्रशस्त असला तरी बाजारपेठेतील मार्ग अरुंद आहे. मुख्य मार्ग एकच असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पहायला मिळत असते. वाहतूक कोंडीतून रत्नागिरीकरांची सुटका करण्यासाठी नवा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
शहरातील सर्व मार्गांवर रस्त्यावर पट्टे मारण्याची सूचना पालिकेला करण्यात आली आहे. त्याप्रमाणे पट्टे मारण्याचे काम नगर पालिकेने हाती घेतले आहे. शहरातील मारुती मंदिर, जेलरोड, रामनाका, गोखलेनाका, लक्ष्मीचौक येथील सिग्नल यंत्रणा तत्काळ सुरु करण्याच्या सूचना पालिकेला देणार असल्याचे धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
शहरात ज्या पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण आहे. त्या जागा तत्काळ मोकळ्या करून तेथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पार्किंगसाठी जागा दिल्यानंतर बेशिस्त पार्किंग करणार्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील मुख्य मार्गावर चारचाकी वाहने पार्किंग होत असल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. मुख्य मार्गावर वाहने उभी राहणार नाहीत, याची दक्षता वाहतूक पोलिसांनी घ्यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात रत्नागिरी शहरातील वाहतुकीला शिस्त लागेल, असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे.