मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील वाहतूक 20 तासांनंतर सुरळीत; सहा क्रेनने टँकर केला बाजूला
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाच्या अवघड वळणावर सोमवारी दि.१ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गॅसचा टँकर उलटला. गॅस गळती झालेल्या टँकरला अखेरीस सहा मोठ्या क्रेनच्या साहाय्याने तब्बल 19 ते 20 तासानंतर सुरक्षित उचलून बाजूला करण्यात आले. घाट १ तास वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. मंगळवार १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने एलपीजी गॅस भरलेल्या टँकरला भोस्ते घाटातील वळणावर अपघात झाला. पलटी झाल्यांनतर गॅस गळती सुरु झाली. लोटे येथील विनती ऑरगॅनिक कंपनीच्या आणि खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी ही गॅस गळती रोखली. बुधवारी सकाळपासून टँकर उचलण्याची प्रक्रिया सुरु केली. महामार्ग पोलीस , खेड पोलीस यांनी दुपारी २ ते ३ या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक तब्बल १ ते दीड तास थांबवली होती.