आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे रत्नागिरी दौऱ्यावर येणार म्हणून ऐन दिवाळीतही कर्मचारी अलर्ट
रत्नागिरी : राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त व डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे हे कधीही रत्नागिरी जिल्हा दौर्यावर येऊ शकतात. या धास्तीने कोणत्याही वैद्यकीय अधिकार्यांनी दिवाळीत सुध्दा मुख्यालय सोडले नाही. कधीही आढावा घेतला तर कामचुकारपणा नको, कारवाई नको यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी सगळ्या बाबींची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे, असे मुंढे यांनी यापूर्वी इतर जिल्ह्यांमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याची धास्ती यंत्रणेला आहे. रत्नागिरीत मुंढे दोन आठवड्यापूर्वीच येणार होते, त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने तशी तयारीही केली होती. आता जिल्ह्यात ते कधीही आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी दाखल होणार असल्याने वैद्यकीय अधिकार्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
तुकाराम मुंढे यांची महिनाभरापूर्वी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी लगेचच राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर कोणत्याही जिल्ह्याला अचानकपणे भेटी देऊन आरोग्य यंत्रणा तपासणी मोहीम हाती घेतली आहे.