आरोग्य सुविधेसाठी राजापुरात सर्वपक्षीय एकवटले
राजापूर : अपुर्या आरोग्य सेवा सुविधांमुळे रूग्णालयात येणार्या रूग्णांची परवड होत आहे. अधिक उपचारासाठी अन्य ठिकाणी रूग्णांना नेताना जीव गमवावा लागतो. या परिस्थितीविरोधात मंगळवारी राजापुरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व तरुणांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयावर धडक दिली. याप्रसंगी ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगला चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर करत रूग्णालयाची सेवा सुधारण्याची मागणी केली.
रुग्णालयातील गैरसोयींबाबत व अपुर्या सेवा-सुविधांबाबत माहिती घेत या शिष्टमंडळाने यासाठी आम्ही सर्वपक्षीय लोक राजकारण बाजूला ठेवून प्रयत्न करू व सेवा उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करू, असेही सांगितले.
राजापूर ग्रामीण रूग्णालयातील अपुरे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, अपुरा औषध साठा व एक्स-रे, सोनाग्राफीसह अन्य सुविधा नसल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. तर कधी-कधी रूग्णांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी वा अन्य ठिकाणी नेताना रूग्णवाहिकाही उपलब्ध होत नसल्याने रूग्णांची परवड होत आहे. योग्य उपचार न मिळाल्याने काही रूग्णांना प्राणही गमवावे लागत आहेत. तर गर्भवती महिलांचीही मोठी गैरसोय होत आहे.
गुरूवारी 27 ऑक्टोबर रोजी शहरातील होतकरू तरूण श्रीकांत उर्फ शिवा खानविलकर याचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. राजापूर ग्रामीण रूग्णालयातून अधिक उपचारासाठी रत्नागिरीत नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. वेळेत रूग्णवाहिका उपलब्ध झाली नाही, त्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले, असा आरोप त्याच्या मित्र परिवाराने केला आहे.
या एकूणच पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुणांनी एकत्रित येत या विरोधात ग्रामीण रूग्णालयावर धडक दिली. याप्रसंगी ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगला चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राजापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार, माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे, हनिफ मुसा काझी, माजी नगरसेवक संजय ओगले ,विनय गुरव, सौरभ खडपे, तसेच दिनानाथ कोळवणकर, सुशांत मराठे, शिवसेना शहर प्रमुख संजय पवार यांनी कैफियत मांडली.
यावेळी डॉ. चव्हाण म्हणाल्या, त्या तरूणावर या ठिकाणी शक्य होते ते उपचार करण्यात आले होते. त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरीत पाठविण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने त्याचा रस्त्यात मृत्यू झाला. त्यावेळी दोन्ही रूग्णवाहिका या रूग्ण घेऊन रत्नागिरीत गेल्याने उपलब्ध झाल्या नाहीत, असे सांगितले. रुग्णालयातील अनेक गैरसोयींबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. अनेक पदे रिक्त असून अनेक सुविधाही नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तरीही येणार्या रूग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले व यासाठी आपणही पाठपुरावा करावा, अशी विनंती केली.
यावर ज्या सुविधा अपुर्या आहेत, त्याबाबत लेखी माहिती द्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली व यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे सांगितले. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष बाकाळकर, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, रामचंद्र सरवणकर, नरेश दुधवडकर, माजी नगराध्यक्षा कल्याणी रहाटे, जितेंद्र मालपेकर, विजय गुरव, दशरथ दुधवडकर, रूपेश साखरकर, मनसेचे शहर अध्यक्ष आजिम जैतापकर, भाजपाचे अरविंद लांजेकर, संदेश आंबेकर, संतोष सातोसे, प्रकाश फोडकर, निलेश सोगम, दिलीप आरेकर, सतीश बडंबे आदींसह रिक्षा संघटना पदाधिकारी व तरूण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.