लांजात नळपाणी योजनेमुळे चौपदरीकरणाला खो; व्यापारी संघटना आक्रमक

लांजा : महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामामुळे नळपाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन वारंवार विस्कळीत होत आहे. यामुळे नगरपंचायतीकडून सातत्याने उड्डाणपुलाचे सुरू असलेले काम थांबवावे लागत असल्याने उड्डाणपुलाच्या कामाला दिरंगाई होत आहे.  जुनी पाईपलाईन नगरपंचायतीचे तातडीने बदलून घ्यावी, अशी मागणी तालुका व्यापारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत नगरपंचायतीने त्वरित कोणतीही कारवाई केली नाही तर व्यापारी संघटना आणि सर्वच स्तरातील नागरिकांच्याच्यावतीने सनदशीर मार्गाने ठोस भूमिका घेतली जाणार असल्याचा इशारा, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी दिला आहे.
महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अनेक वर्षे हे काम रखडले आहे. यामध्ये लांजा शहराला नळपाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कारणीभूत ठरत आहे.  राष्ट्रीय महामार्ग विभागाने नगरपंचायतीला ही पाईपलाईन नव्याने जोडून घ्यावे, यासाठी कळविले आहे. परंतु नगरपंचायतीकडून याबाबत कोणताही पाठपुरावा होत नसल्याने ही जीर्ण झालेली जुनी पाईपलाईन जैसे थे आहे.
महामार्ग कामातील सिमेंट फाउंडेशन झाल्यानंतर खोदाई करता येणार नसल्यामुळे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाला जुनी पाईपलाईन बदलणे अथवा दुरुस्त करणे भविष्यात अत्यंत त्रासाचे होणार आहे. तरी नगरपंचायतीकडून ही पाईपलाईन बदलणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र 2018 पासून नगरपंचायत स्तरावर याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने महामार्गाचे काम वेळोवेळी ठप्प होत आहे. दरम्यान हे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य पसरलेले असून सर्व्हिस रोड पूर्णत्वास गेलेले नाहीत. धुळीचे साम्राज्य असल्याने व्यापार्‍यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button