पुण्यातील पर्यटकाचा दापोलीत मृत्यू ; समुद्रातून पोहून आल्यानंतर उलटी व चक्कर
दापोली : पुण्यातील हडपसर येथील पर्यटकाचा दापोलीत मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी पोहण्याचा आनंद लुटून समुद्राबाहेर आलेल्या पर्यटकाची अचानक प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना 31 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुमित गिरमे (राहणार दत्तकृपा कॉलनी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली. ते व त्यांचे काही मित्र हे पुणे येथून आंजर्ले समुद्रकिनारी पर्यटनासाठी आले होते. बारा वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी गेले. काही वेळाने सर्वच जण बाहेर पडले. त्यातील स्वप्नील रामचंद्र पाटील (वय 31, रा. यशराज कॉम्प्लेक्स ससाणेनगर, हडपसर, पुणे) हा पोहून बाहेर आल्यानंतर त्याला अचानक उलटी व चक्कर येऊन फिट आली. त्याला आंजर्लेतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे अधिक उपचारासाठी दाखल केले. मात्र दीड वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल चौरे करीत आहेत.