शेतकरी, कष्टकर्‍यांना पंढरीची वारी घडवण्यातून समाधान : उद्योजक सुरेश कदम

0
121

देवरूखमधून तीनशेपेक्षा जास्त वारकरी मोफत बसने पंढरपूरला रवाना, लक्ष्मी-वात्सल्य संस्थेचा उपक्रम

देवरूख : माझ्या किरदाडी गावाच्या आजुबाजूच्या गावांमध्ये शेतकरी, कष्टकरी समाज राहतो. त्यांना पंढरपूर यात्रा घडवावी, या भावनेतून मागील सहा वर्षे हा मोफत वारी प्रवासाचा उपक्रम राबवत आहे. सुमारे शेतकरी, कष्टकर्‍यांना पंढरपूर वारी घडवताना मी माझ्या आईवडिलांनाच जणू काही पंढरपूरला नेतोय, असे मला मनोमन वाटते. वारी घडवून आणण्याची सेवा समाधान देते, असे प्रतिपादन उद्योजक व समाजसेवक सुरेश कदम यांनी व्यक्त केले. पंढरपूर वारीच्या मोफत बससेवेचा शुभारंभ सोहळा देवरूख येथे रंगला. स्वा. सावरकर चौकात झालेल्या या कार्यक्रमानंतर वारकर्‍यांच्या सहा मोफत बस पंढरपूरकडे रवाना झाल्या. या कार्यक्रमावेळी सुरेश कदम बोलत होते.
किरदाडी येथील उद्योजक सुरेश कदम यांनी आई लक्ष्मी कदम व वडील आत्माराम कदम यांच्या स्मरणार्थ वीस गावांतील तीनशेपेक्षा अधिक वारकर्‍यांना पंढरपूर वारीसाठी मोफत एसटी बसची सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा शुभारंभ कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत देवरूख येथे झाला. यावेळी उद्योजक सुरेश कदम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, नायब तहसीलदार सुदेश गोताड, पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, सुरेश बने, वेदा फडके, नेहा माने, दिलीप बोथले, सुनील सावंत, राजू वणकुद्रे, पंडित रामानुज तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उद्योजक सुरेश कदम म्हणाले, माझ्या आईवडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबवत आहे. या वारीच्या माध्यमातून माझ्या आईवडिलांची सेवा मी करतोय. या उपक्रमातून मिळणारे समाधान न मोजता येणारे आहे. माजी राज्यमंत्री रवींद्र माने म्हणाले, सामान्यांचा विचार करत कदम यांनी राबवलेला वारीचा उपक्रम स्तुत्य आहे. पंढरपूरला तुम्ही जात आहात याचा आनंद आहे. येताना आपल्यातील वाईट गुणांचे विसर्जन चंद्रभागेत करून या. वेदा फडके, सुरेश बने यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत वारकर्‍यांना शुभेच्छा दिल्या. युयुत्सु आर्ते म्हणाले, माजी राज्यमंत्री माने यांनी त्यांच्या कार्यकाळात कोकणातील वारकर्‍यांसाठी पंढरपुरात भक्तनिवास बांधले. या त्यांच्या वारकरी चळवळीला सुरेश कदम यांनीही जोड दिली आहे. वारकरी सांप्रदायाला बळ देण्याचे काम कदम यांच्याकडून सुरू असून त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र नांदळजकर यांनी केले.
कार्यक्रमावेळी महेंद्र नांदळजकर , सुनील करंडे यांनी तयार केलेल्या कार्यअहवाल व स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील विविध गावांतील वारकरी यावेळी उपस्थित होते. सहा एसटी बसेसची फीत मान्यवरांच्या हस्ते कापून या बस पंढरपूरकडे रवाना झाल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष चाळके, सुनील करंडे, महेंद्र नांदळजकर, संतोष जाधव, गजानन आंबे्र, आत्माराम पेंढारी, प्रकाश करंडे, प्रवीण पेडणेकर, संजय घाग, गोविंद चाळके, बाळकृष्ण उबारे, सुमित सुर्वे, सईद बोथले यांनी मेहनत घेतली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला अभंगवाणी हा कार्यक्रम गायक आनंद लिंगायत, अभय नांदळजकर, संस्कृती ब्रीद, निहाली गद्रे यांनी सादर केला. पखवाज-सुशांत मेस्त्री, तबला-ओंकार ब्रीद, टाळ – साईराज कडवईकर यांचे सहकार्य लाभले. निवेदन-भागवत मॅडम यांनी केले. सुमधूर अभंग सादर करताना यावेळी विठुरायाची पंढरी अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here