चिपळूणमध्ये 18 लाख रूपये किमतीच्या सार्वजनिक शौचालयात कमी दर्जाचे साहित्य
चिपळूण : माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील शौचालयाच्या निकृष्ट कामासंदर्भात तक्रार केली आहे. पेठमाप येथे प्रशासकीय कामकाज अंतर्गत उभारण्यात आलेल्या 18 लाख रूपये किंमतीच्या सार्वजनिक शौचालयात कमी दर्जाचे व किंमतीचे साहित्य वापरल्याचे उघड होत आहे.
माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या कारकीर्दीत शहरतील शौचालये उभारणीच्या कामाला 58(2) अंतर्गत मंजुरी दिली होती. हा विषय वादग्रस्त ठरला. त्या संदर्भात मुकादम यांनी वारंवार तक्रारी केल्या. पेठमाप येथे 58(2) अंतर्गत शौचालय उभारणी कामासंदर्भात देखील तक्रार करण्यात आली होती. मात्र, परिसरातील नागरिकांची सातत्याने मागणी व पाठपुरावा लक्षात घेऊन प्रशासनाने हे काम तातडीने सुरू केले. काम पूर्णत्वाच्या मार्गावर असताना मुकादम यांनी कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त करून तक्रार केली. तरीदेखील काम घाईगडबडीत पूर्ण करण्यात आले व संबंधित ठेकेदाराला बहुतांश रक्कम देण्यात आल्याचे सांगितले जाते. तक्रारीनंतर काही दिवसांतच नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत पुन्हा शंका व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यातूनच 18 लाख रूपये खर्च केलेल्या शौचालयात जे साहित्य वापरण्यात आले आहे, ते अत्यंत निकृष्ट व कमी दर्जाच्या रक्कमेचे असल्याचे हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. बसविण्यात आलेले नळाचे कॉक प्लास्टीकचे तर बेसिनची भांडी देखील कमी किंमतीची व तकलादू असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच अठरा लाख रूपयांच्या शौचालय उभारणीसाठी वापरण्यात आलेले अनेक साहित्य अंदाजपत्रकानुसार वापरले नसल्याचे तसेच कमी किंमत व दर्जाचे असल्याचे मुकादम यांचे म्हणणे आहे.