रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक बदल्यांचा मार्ग मोकळा; शाळांची यादी तयार

0
73

रत्नागिरी : कोरोनामुळे दोन वर्षे रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या बदल्यांना अखेर दिवाळीत मुहूर्त मिळाला आहे. नव्या वर्षात गुरूजींना नवीन शाळा मिळणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले असून अवघड क्षेत्राच्या शाळांची यादी निश्‍चित झाली आहे. यामध्ये 686 शाळांचा समावेश करण्यात आला आहे.
ज्या शिक्षकांनी अनेक वर्ष सुगम क्षेत्रात काम केले आहे, त्यांना अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे. तर अवघड क्षेत्रातील शिक्षकांना सुगम क्षेत्रात शाळा मिळणार आहेत. कोरोना संकटात शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. त्यात शिक्षकांच्या बदल्याही रखडल्या होत्या. आता बदल्यांसंदर्भात ग्रामविकास विभागाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 21 ऑक्टोबरपासून ही प्रक्रिया सुरू होणार होती, मात्र शासनाने दिवाळी सुट्टी विचारात घेता आता वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून ही प्रक्रिया आता सुरू होईल.
ग्रामविकास विभागाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. त्यासाठी आवश्यक माहिती भरण्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यात अवघड क्षेत्रातील शाळांची यादी निश्चित करून ती सरल पोर्टलवर भरण्यात आली आहे.
बदली प्रक्रियेमध्ये अवघड क्षेत्रात काम केलेल्यांचा कार्यकाळ जुन्या यादीप्रमाणे ठरवण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी अवघड क्षेत्रात 846 शाळा होत्या. त्या शाळांमध्ये काम केल्याची वर्षे बदलीतील निकषांमध्ये विचारात घेतली जातील. बदलीच्या ठिकाणी नियुक्ती देताना नवीन निकषाप्रमाणे यंदा ज्या शाळा अवघड क्षेत्रात निश्चित केल्या आहेत, त्यामध्येच बदली केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here