किरदाडी येथील समाजसेवक सुरेश कदम घडवणार पंढरीची वारी; 31 पासून वारीला प्रारंभ, देवरूख परिसरातील वारकर्यांसाठी मोफत बससेवा
देवरूख : पंढरीच्या विठुरायाला भेटायची आस प्रत्येक वारकर्याला असते. मात्र सामान्यांना ते शक्य होतेच असे नाही. त्यामुळे पंढरीला जाणार्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी किरदाडी येथील समाजसेवक सुरेश कदम यांनी यावर्षीही देवरूख परिसरातील वारकर्यांना एसटी बसची सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. विठ्ठलापर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने परिसरातील वारकर्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील देवरूखनजीकच्या पाटगाव, माळवाशी, आंबव परिसरात वारकरी सांप्रदाय मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. वर्षभर भजन, कीर्तनाच्या टाळांचा नाद या परिसरात ऐकायला मिळतो. दरवर्षी वारी आली की या पंचक्रोशीतील वारकर्यांना वेध लागतात ते विठ्ठलाच्या भेटीचे.
मानवी जन्मात आल्यानंतर पंढरीची वारी एकदा तरी करावी, असे संतांच्या अभंगात वाचायला मिळते. अनेकांची ही इच्छा अपूर्णच राहते. मात्र सुरेश कदम यांच्यामुळे ही इच्छा पूर्ण होत आहे, अशी प्रतिक्रिया या परिसरातील वारकर्यांतून व्यक्त होत आहेत. दरवर्षी पावसाळा संपला की भातशेती आटपून पंढरीकडे जाण्याचा कल माळवाशी, किरदाडी, देवरूख परिसरातील वारकर्यांचा असतो. कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीच्या वारीसाठी यंदाही शेतकर्यांनी आपली शेतीची कामे आटपली असून आता पंढरीला जाण्याचे वेध या परिसरातील शेतकर्यांना लागले आहेत.
या पंचक्रोशीतील गावात मागील अनेक वर्षांपासून पंढरीच्या वारीची परंपरा जोपासली जाते. सुरेश कदम यांनी ही वारीची परंपरा अखंड सुरू ठेवली आहे. आई लक्ष्मी कदम व वडील आत्माराम कदम यांच्या स्मृतीनिमित्त पंढरपूर यात्रा मोफत बससेवा हा उपक्रम मागील अनेक वर्षांपासून राबवला जात आहे. दि. 31 रोजी सकाळी 8.00 वाजता कार्तिक सप्तमीच्या मुहुर्तावर सहा बसेस देवरूख येथून पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. स्वातंंत्र्यवीर सावरकर चौक येथून या वारीला प्रारंभ होणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी या बसेस पुन्हा माघारी येणार आहेत.
या शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्था माळवाशी-किरदाडीचे अध्यक्ष सुरेश कदम, संतोष चाळके, सुनील करंडे, महेंद्र नांदळजकर, संतोष जाधव, गजानन आंब्रे, आत्माराम पेंढारी, प्रकाश करंडे, प्रवीण पेडणेकर, संजय घाग, गोविंद चाळके, बाळकृष्ण उबारे, सुमित सुर्वे यांनी केले आहे.