लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करणाऱ्या युवकावर गुन्हा
चिपळूण : धामणवणे येथे एका तरुणाने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी युवतीने चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. वैभव राजाराम जाधव (28, धामणवणे, बौध्दवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव जाधव याची एका युवतीशी कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले. सोशल मिडियातून त्यांची मैत्री अधिक वाढत गेली. जून मध्ये या तरुणाने युवतीला आपल्या बहिणीने भेटायला घरी बोलावले आहे, असे सांगून घरी बोलावले आणि घरी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला असे युवतीचे म्हणणे आहे. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहिला. मात्र त्याने लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने पोलीस स्थानक गाठले. त्याच्याविरोधात रितसर तक्रार दाखल केली. शनिवार 22 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे करत आहेत.