मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटात मासळीवहून कंटेनर उलटला केबिनमध्ये अडकून पडल्याने चालक जखमी; महत्प्रयासाने चालकाला वाचवण्यात यश

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ब्रेक निकामी झाल्याने ताजी मासळी वाहून नेणारा कंटेनर रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन शेतात पलटी झाला. कंटेनरच्या केबिनमध्येपाय अडकून फसलेल्या चालकाला पोलीस आणि नागरिकांनी महत्प्रयासाने बाहेर काढले. हा अपघात रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर मासळीचे क्रेट शेतात अस्तावस्त पडल्याने अपघातस्थळी माशांचा खच पडलेला पहावयास मिळतात होता.
गुजरात राज्यातील वेरावळ ट्रान्सपोर्ट कंपनीचा कंटेनर ताजी मासळी (बांगड्याचे क्रेट) घेऊन गोव्याकडून मुंबईकडे चाललेला होता. महामार्गावरील भोस्ते घाट उतरत असताना कंटेनरचे ब्रेक अचानक निकामी झाले आणि चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. चालकाने कंटेनर नियंत्रित करण्याच्या प्रयत्न केला मात्र तो कंटेनर भोस्ते घाटातील स्वरूप ढाब्याजवळ रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन शेतात पलटी झाला
अपघात झाला तेव्हा झालेल्या मोठ्या आवाजाने आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. केबिनमध्ये पाय अडकलेला चालक मदतीसाठी याचना करत होता. वेदना असह्य झाल्याने त्याची तडफड सुरु होती मात्र क्रेन शिवाय त्याला बाहेर काढणे शक्य नव्हते.अपघात झाला तेव्हा काळोख असल्याने मदत कार्यात अनेक अडचणी येत होत्या. घटना स्थळी पोहचलेल्या युवकांनी कंटेनरची केबिन उचलण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला. अपघातानंतर मासळीचे क्रेट शेतात फेकले गेल्याने शेतात बांगड्यांचा खच पडल्याचे चित्र होते.
खेड पोलिसांना अपघाताची खबर मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालक मदतीसाठी टाहो फोडायचं होता मात्र क्रेनशिवाय चालकाला बाहेर काढणे शक्य नव्हते. परिस्थिती गंभीर असल्याने पोलिसांनी तात्काळ क्रेनला पाचारण केले. घटनास्थळी क्रेन पोहचताच क्रेनच्या मदतीने कंटेनरची केबिन वर उचलून अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढले आणि रुग्णालयात पाठवून दिले.
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाट हा दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. दोन दिवसांपूर्वीच एका भरधाव वेगातील कंटेनरने महामंडळाची एसटी बस, दुचाकी आणि युटिलिटी जीपला धडक देऊन अवघड वळणावरील संरक्षक भिंतीवर आदळला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी रात्री पुन्हा कांटेरीनचा भीषण अपघात झाल्याने भोस्ते घाटातून प्रवास करताना चालक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे.

चौकट : मासळीवाहू कंटेनर शेतात पलटी झाल्याने कंटेनर मधील क्रेट शेतात पसरले त्यामुळे अपघातस्थळी ताज्या मासळीचा खच पडला पडला होता. घटनास्थळी पोहचलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मासे वेचून रविवारचे रात्रीचे जेवण लज्जतदार बनवले. आज सकाळी देखील अनेकजण शेतात विखुरलेले मासे वेचताना दिसत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button