![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2022/10/road-accident-shutterstock.jpg)
फिनोलेक्सफाटा येथे दुचाकींची समोरासमोर धडक
रत्नागिरी : रत्नागिरी पावस मार्गावरील फिनोलेक्सफाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.रविवारी रात्री 8:45 हा अपघात झाला.
रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील स्मितेश दिलीप जोशी (वय 28) हा आपला मित्र प्रसाद सुधीर राऊळ (वय 25) याच्यासमवेत पावस येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. यावेळी बासीन रहीम भट्टीवाले (वय 24) हा रत्नागिरीतून गावखडी येथील आपल्या गावी जात होता. रविवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास फिनोलेक्स कंपनी फाटा येथे एका तिसऱ्या दुचाकी स्वाराने हूल दिल्यानंतर स्मितेश जोशी व बासीन भट्टीवाले या दोघांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्मितेश दिलीप जोशी याचा जागीच मृत्यू झाला. तर बाशिंग भट्टीवाले, प्रसाद राऊळ हे गंभीर जखमी झाले आहेत. तिघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तपासणी केल्यानंतर स्मितेश दिलीप जोशी याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
स्मितेश जोशी हा मूळचा काळबादेवी येथील असून सध्या उद्यमनगर येथे राहत होता. मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्याला असलेला स्मितेश दिवाळी सणासाठी दोन दिवसापूर्वी आपल्या गावात काळबादेवी येथील गावी आला होता. पेशाने इंजिनियर असलेला स्मितेश मुंबईतून परदेशात नोकरीसाठी जाणार होता. परंतु काळाने त्याच्यावर घाला घातला. स्मितेशच्या मृत्यूचे वृत्त काळबादेवी परिसरात पसरतात नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत प्रचंड मोठी गर्दी केली होती. तर या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पूर्णगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही पूर्णगड पोलिस स्थानकात सुरू होती.