राजापुरात गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनची तयारी

राजापूर शहराला पावसाळी हंगामात दरवर्षी भेडसावणारी महापुराची समस्या आणि उन्हाळी हंगामात जाणवणारी तीव्र पाणीटंचाई याच्या मुळाशी जाताना अर्जुना नदीपात्रात आणि कोदवली धरणात साचलेल्या गाळाची अडचण असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, गाळ काढण्यासाठी लागणार्‍या लाखो रुपयांच्या निधीकरिता वर्षानुवर्षे शासनाकडे डोळे लावून बसलेल्या राजापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी पुढे आली. राजापूरकरांनी लोकसहभाग दर्शवल्यास नाम फाऊंडेशनने दोन्ही नदीपात्रे आणि कोदवली धरण यातील गाळ काढण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
मुख्याधिकारी प्रशांत भोसले आणि प्राथमिक शिक्षक रघुवीर बापट यांच्या माध्यमातून नाम फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी राजापूरला नुकतीच भेट देत कोदवली नदीपात्र आणि धरणात साचलेल्या गाळाची पाहणी केली. या पदाधिकार्‍यांमध्ये चिपळूणमधील समीर जानवलकर आणि राजेश्‍वर देशपांडे यांचा समावेश होता. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मोठे काम करण्यात आले आहे. याच फाऊंडेशनच्या माध्यमातून कोकणातील महाडसोबतच चिपळूणमधील शीव व वाशिष्ठी नदीच्या गाळाचा उपसा करण्यात आलेला आहे. नाम फाऊंडेशनने महापुराला आवर घालू शकणार्‍या गाळ उपशाचा प्रश्न मार्गी लावल्याने चिपळूणवासियांना यंदाच्या वर्षी दिलासा मिळाला
आहे.
राजापूर शहरात प्रतिवर्षी अर्जुना नदीला येणारा पूर आणि अर्जुनेला पूर आल्यानंतर कोदवलीच्या गोड्या नदीचे बॅकवॉटर राजापूर शहरात शिरून होणारी पूरस्थिती परवलीची झालेली आहे. या दोन्ही नदीपात्रात प्रचंड स्वरुपाचा गाळ साचल्याने पुराची भीषणता वाढते. गाळामुळेच हा पूर येत असून, तो काढण्याच्या दृष्टीने शासकीय पातळीवरून अजिबात हालचाल झालेली नाही. उलट  शहरात 2008 साली आखण्यात आलेली पूररेषा रद्द करून शासनाने नव्याने पूररेषा आखताना निळ्या व लाल रेषेद्वारे नागरिकांना घरांची बांधकामे व दुरूस्ती यांना प्रतिबंध केला आहे. याचा फटका बसून निम्म्या राजापूरकरांसमोर स्थलांतराचाच पर्याय उरलेला असताना नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनने राजापूरकरांना सहकार्य केल्यास शहरात भरणार्‍या या पुराच्या पाण्याची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.
नाम फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांसोबत झालेल्या
चर्चेप्रसंगी मुख्याधिकारी प्रशांत भोसले, महेश शिवलकर, न. प. चे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, अभियंता स्वप्नील पड्यार, रघुवीर बापट आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button