मुरूडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी उघडणार निविदा
दापोली : मुरूड समुद्रकिनार्यावरील शिवसेना नेते अनिल परब यांच्या वादग्रस्त रिसॉर्टवर हातोडा पडणार आहे. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा देखील काढली आहे. दि. 14 नोव्हेंबर रोजी ही निविदा उघडणार असून त्यानंतर रिसॉर्ट पाडण्याची प्रत्यक्ष कार्यवाही होणार आहे. या रिसॉर्ट प्रकरणी भाजपचे किरीट सोमय्या यांनी पर्यावरण मंत्रालयाकडे दाद मागितली. चिपळूण येथील विभागीय बांधकाम अधिकार्यांनी रिसॉर्ट पाडण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. त्यासाठी कंत्राटदारांना 10 नोव्हेंबरपर्यंत निविदा भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि. 14 नोव्हेंबर रोजी ही निविदा उघडण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. त्यामुळे रिसॉर्ट पाडण्याचे काम नोव्हेंबरच्या पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची शक्यता सोमय्या यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे. साई रिसॉर्टच्या एन. एक्सचे बांधकाम, रस्ता, कंपाऊंड वॉल, इमारतीच्या भिंती पूर्ण पायापर्यंत पाडण्यात येणार आहेत व त्यानंतर उरलेल्या सिमेंट आणि मातीचा ढिगारा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी देखील संबंधित ठेकेदारावर असणार आहे. याबाबत ट्विटरद्वारे सोमय्या यांनी माहिती दिली आहे.