
‘माध्यमिक पतपेढीच्या विद्यमान संचालक मंडळाकडून सहा वर्षांत वारेमाप खर्च करून सामान्य सभासदांच्या पैशाची उधळपट्टी’
रत्नागिरी : जिल्हा माध्यमिक शाळा सहकारी पतपेढीच्या विद्यमान संचालक मंडळाने आपल्या सहा वर्षांच्या कालावधीत वारेमाप खर्च करून सर्वसामान्य सभासदांच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. याबाबत नाराजी असून, पतपेढीच्या येऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक लोकशाही आघाडीमार्फत लढविणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे (टीडीएफ) अध्यक्ष सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.
टीडीएफ, कास्ट्राईब संघटना व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी बहुतांशी सभासदांची इच्छा आहे. विद्यमान संचालक मंडळाने गेल्या 6 वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उधळपट्टी केली आहे. शाखा दुरुस्ती, फार्निचर, बांधकाम या विषयावर लाखो रुपये अनावश्यक खर्च केले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
बेकायदेशीर पद्धतीने कर्मचारी भरती करण्याचा प्रयत्न अध्यक्ष असताना आपण हाणून पाडला असल्याचे विद्यमान संचालक व कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वाघोदे यांनी स्पष्ट केले. यामुळे मला संचालक मंडळातून बहिष्कृत केल्याची वागणूक दिली जात असून कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्मचारी भरती संदर्भात न्यायालयीन प्रकरण सुरू असताना देखील पुन्हा कर्मचारी भरती करण्याचा घाट संचालक मंडळाने घातला आहे. पतपेढीच्या सर्व सभासदांचा याला विरोध असून उपनिबंधकांकडे तक्रार केली असल्याचे वाघोदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी टीडीएफचे जिल्हा उपाध्यक्ष सुशांत कविस्कर,दिनेश वेताळे, सदाशिव चावरेकर, आत्माराम मेस्त्री, रामचंद्र महाडिक, जमालुद्दीन बंदरकर, समी मोमीन, कास्ट्राईबचे राजेश कांबळे उपस्थित होते.