
मनसेचे वैभव खेडेकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
खेड : कोकणातील मनसेचे नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. गणेशोत्सव काळातील लॉटरी प्रकरणात ते गोत्यात आले होते. आता समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी खेडेकर यांच्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मागासवर्गीयांचा निधीही स्वतःच्या स्वार्थासाठी वापरल्याचा ठपका सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून वैभव खेडेकर यांच्या विरोधात ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे खेडेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणावरून मनसे नेते वैभव खेडेकर यापूर्वीच अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणात खेडेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दि. 21 रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. यानंतर शनिवारी समाज कल्याण विभाग रत्नागिरीच्या सहायक आयुक्तांनी खेडेकर यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे. सहायक आयुक्तांच्या तक्रारीनुसार खेड पोलिस ठाण्यात खेडेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे खेडेकर यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मनसे नेते वैभव खेडेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात खेडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात होती. या प्रकरणात अटकेपासून सरंक्षण मिळावे यासाठी खेडेकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात त्यांच्या अटकेसाठी पोलिस त्यांचा शोध घेत होते. गुरुवारी या प्रकरणात मनसेच्या तीन पदाधिकार्यांनाही पोलिसांनी अटक केली होती. आता पुन्हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मागासवर्गीयांचा निधीही स्वतःच्या स्वार्थासाठी वापरल्याचा ठपका सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून वैभव खेडेकर यांच्या विरोधात ठेवण्यात आला आहे. त्यांनी दि. 8 फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयात खेड नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मौजे भडगाव भरणे बाईतवाडी बौध्दवाडी येथे 2015-16 विशेष घटक साकव बांधणी योजनेंतर्गत मंजूर साकव हा मागासवर्गीयांसाठी न बांधता एका खासगी इमारतीत जाण्यासाठी पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल केल्याचे म्हटले आहे. प्रशासकीय मान्यतेच्या अटी व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश समाजकल्याण आयुक्तांनी दिले आहेत.
या साकवाचा मागासवर्गीय वस्तीला लाभ होत नाही, या साकवासाठी मागासवर्गीय नागरिकांची मागणी नाही. एका खासगी इमारतीत ये-जा करण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा व त्याचा लाभ बिल्डरला मिळावा हा हेतू साकव बांधण्याचा असल्याचे स्पष्ट दिसून येते असे निरीक्षण समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याकडे कळवले आहे. त्या अहवालाच्या आधारे दि. 9 मे 2022 रोजी राज्य शासनाचे कक्ष अधिकारी प्रशांत वाघ यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून वैभव खेडेकरांवर विनाविलंब कारवाई करावी, अशा सूचना केल्या आहेत.